दिवा शहरातही समूह विकास योजना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६१० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उदघाटन
ठाणे, दि. ८
दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे केली. दिव्यातमध्ये पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी ५ कोटींचा देण्याची घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
ठाणे महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या दिवा शहरातील सुमारे ६१० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाल. त्यावेळी ते बोलत होते.
दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन रस्ता येथील आरोग्य केंद्र, दातिवली गावातील व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गावातील शाळा, देसाई खाडी पुल आदी कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.
बेतवडे येथे पंतप्रधान आवास योजनेतील २ हजार ८०० घरांचा प्रकल्प उभा राहात आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून १० लाख घरे बांधण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही भाषण झाले. महापालिका आयुक्त डॉ. बांगर यांनी प्रास्ताविक केले. खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरण कामांचे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन दिवा येथील खिडकाळेश्वर महादेव मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरणाचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
येथील भूमिपुत्रांचे आराध्य दैवत असलेल्या या मंदिराचे सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
—–
