लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्रासाठीचे योगदान सह्याद्री पर्वताएवढे- राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. ८
आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात राज्याच्या विकासाचा आलेख उंचाविणारे राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे राज्यासाठीचे योगदान सह्याद्री पर्वताएवढे मोठे होते, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल येथे केले.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनावरील ‘दौलत’ (बाळासाहेब देसाई : व्यक्तित्व ..कर्तृत्व ..नेतृत्व’) या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते बुधवारी राजभवन येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
बाळासाहेब देसाई यांनी राज्यात एका मजबूत संसदीय लोकशाहीचा पाया रचला. बाळासाहेब देसाई ‘राज्याचे लोहपुरुष’ होते. त्यांच्या जीवन कार्यावरील प्रकरण पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जावे अशी सूचना राज्यपालांनी केली.
बाळासाहेब देसाई यांनी प्रत्येक खात्यात ऐतिहासिक कामगिरी केली व क्रांतिकारक निर्णय घेतले असे सांगून त्यांचा चरित्र ग्रंथ भावी पिढ्यांसाठी सच्ची ‘दौलत’ सिद्ध होईल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
रायगड किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बाळासाहेब देसाई यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्याचा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे स्थापन करण्याचा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेटवे ऑफ इंडिया आणि शिवाजी पार्क येथे स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
ग्रंथाचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनीही मनोगत व्यक्त केले.
——–
