स्वित्झर्लंड भारताशी मुक्त व्यापार करण्यास उत्सुक- राजदूत डॉ. राल्फ हेकनर
मुंबई दि.३१ :- भारतात किमान ३३० स्विस कंपन्या कार्यरत असून त्यापैकी १५० एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे स्वित्झर्लंड करिता सर्वात महत्वाचे राज्य असून स्वित्झर्लंड भारताशी मुक्त व्यापार करार करुन हे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन स्वित्झर्लंडचे भारतातील राजदूत डॉ राल्फ हेकनर यांनी केले. डॉ राल्फ हेकनर यांनी मंगळवारी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
आपण सार्वजनिक व खासगी विद्यापीठांच्या प्रमुखांशी नुकतीच भेट घेतली. विद्यापीठांमध्ये होत असलेल्या संशोधनाचा व्यापाराला लाभ व्हावा याकरिता स्वित्झर्लंडच्या पुढाकाराने उद्योग व विद्यापीठांकरिता एक सामायिक ‘नाविन्यता व्यासपीठ’ (‘इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’) सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे राजदूतांनी सांगितले.
स्वित्झर्लंड – भारत मुक्त व्यापार करार झाल्यास कोणकोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध होतील याची माहिती धोरणकर्त्यांना तसेच उद्योगजगताला देण्यासाठीच आपण मुंबई भेटीवर आलो असल्याचे डॉ. हेकनेर म्हणाले. स्वित्झर्लंड सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान व औषधीनिर्माण या क्षेत्रातील कौशल्य प्रधान देश असून उभय देशांत कौशल्य आदान – प्रदान करार झाल्यास भारतातील युवकांच्या कौशल्याचा अनेक देशांना फायदा होईल असे राज्यपाल बैस यांनी सांगितले. विद्यापीठांचा कुलपती या नात्याने उभय देशांमधील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी – तसेच अध्यापक – आदानप्रदान वाढावे अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली.
