‘मला काय त्याचे’ ही वृत्ती हिंदूंनी सोडावी
रणजित सावरकर यांचे आवाहन
मुंबई दि.१५ :- पोर्तुगीजांनी गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केली हा इतिहास आपण विसरता कामा नये. त्यासाठी प्रत्येक मंदिराच्या आवारात त्या मंदिराचे मूळ स्थान कोठे होते?, ते तेथून का स्थलांतरीत करावे लागले?, तेथे कोणते अत्याचार झाले? याचा इतिहास प्रदर्शित केला पाहिजे. ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती हिंदनी सोडून द्यावी, असे आवाहन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष तथा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी म्हापसा- गोवा येथे केले.
हिंदु जनजागृती समितीतर्फे श्री सिद्धनाथ नारायण देवस्थान सभागृह, काणका, म्हापसा येथे रविवारी प्रांतीय हिंदु-राष्ट्र जागृती अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी सावरकर बोलत होते. यावेळी राष्ट्रीय बजरंग दलाचे नितीन फळदेसाई, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे उपस्थित होते. जेव्हा हिंदू तेजस्वी बनेल, तेव्हाच त्याच्याकडे वाईट नजरेने कुणीही पहाणार नाही. याचा आरंभ गोव्यातून झाला पाहिजे, असेही सावरकर म्हणाले.
राष्ट्रीय बजरंग दलाचे फळदेसाई म्हणाले, पोर्तुगीजांनी ‘इन्क्विझीशन’च्या माध्यमातून गोमंतकीय हिंदूंवर केलेले अत्याचार ‘गोवा फाईल्स’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्यात आले आहेत. गोमंतकियांवर ‘इन्क्विझीशन’ लादून क्रूर अत्याचार करणारा फ्रान्सिस झेविअर हा ‘गोयंचो सायब’ कसा होऊ शकतो?’’ असा सवालही त्यांनी केला.
तर गोमंतक ही हिंदूंची भूमी असून गोमंतकाचा खरा इतिहास जनतेसमोर यावा आणि येथील परंपरा, संस्कृतीचे संरक्षण व्हावे, असे हिंदू जनजागृती समितीचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी अभिजीत देसाई, ‘परशुराम गोमंतक सेने’चे अध्यक्ष शैलेंद्र वेलींगकर, ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे जयेश थळी, हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यांचीही भाषणे झाली.
