Thursday, August 20, 2026
Latest:
गुन्हे-वृत

कल्याणमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण; कल्याण-डोंबिवलीत अपहरणांचे सत्र सुरुच असल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

कल्याण:

कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा परिसरातून आजीसाठी औषधे आणायला गेलेल्या एका १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे रहस्यमयरीत्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, कल्याण-डोंबिवली परिसरात बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे. पोलिसांच्या गस्त आणि गुन्हे नियंत्रणाच्या दाव्यांवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आजीसाठी औषध आणायला गेली आणि गायब झाली:

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंब मूळचे मुरबाड तालुक्यातील किसळ गावचे असून सध्या कल्याण पश्चिमेतील शिशु विकास शाळेजवळील बेतुरकरपाडा येथील भोईर चाळीत राहते. पाच दिवसांपूर्वी तिचे आई-वडील मूळ गावी गेले होते. घरी दोन मुली आणि त्यांची आजी होत्या. बिर्ला महाविद्यालयात १२ वी कला शाखेत शिकणारी १७ वर्षीय मुलगी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आजीसाठी औषध आणायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली.

बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने तिच्या बहिणीने परिसरात शोध सुरू केला. तिच्या वडिलांनी मुरबाड येथून फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल सतत व्यस्त येत होता. नातेवाईक व मैत्रिणींकडे चौकशी करूनही शोध न लागल्याने अखेर कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दर आठवड्याला दोन अपहरणे; पोलिसांची यंत्रणा सुस्तावली?

कल्याण-डोंबिवली परिसरात बालके आणि अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण दिवसेंदिवस चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या वर्षभरात या परिसरातून ५० हून अधिक बालकांचे अपहरण झाले आहे. कल्याण-डोंबिवली क्षेत्रात दर आठवड्याला सरासरी दोन अल्पवयीन बालकांचे अपहरण होत असून यामध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे.

विशेषतः कल्याण पूर्वेतील पिसवली, खडेगोळवली आणि दावडी या भागांतून लहान मुलांना फूस लावून पळवून नेण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. पोलिसांची गस्त आणि सुरक्षा व्यवस्था निष्प्रभ ठरत असल्यामुळेच अपहरणकर्त्यांचे धाडस वाढल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे।

मुलींना पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय

गेल्या काही महिन्यांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात अल्पवयीन मुलींना लक्ष करणारी एक टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या महिन्यात पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या काही जणांना अटक केली होती. मात्र, पोलिसांच्या या तुटपुंज्या कारवाईनंतरही अपहरणाचे सत्र रोखण्यात यश आलेले नाही.

तपास यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाने या सर्व घटनांची गंभीर दखल घेऊन तात्काळ ठोस पावले उचलावीत, रात्रीची गस्त वाढवावी आणि अपहरणकर्त्यांच्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करावा, अशी जोरदार मागणी आता पालकांकडून केली जात आहे.