Saturday, July 11, 2026
Latest:
धर्म संस्कृती

पंढरपूर वारी थर्माकॉल-प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प: ‘थं क्रिएटिव्ह’कडून २.५ कोटी पत्रावळ्यांचे वाटप, डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे आर्थिक मदतीचे आवाहन

पुणे:

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त निघणारी पंढरपूरची वारी पर्यावरणपूरक आणि ‘निर्मल वारी’ करण्यासाठी एक अनोखी लोकचळवळ राबवली जात आहे. ‘थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता मंच’च्या माध्यमातून प्रशांत अवचट गेल्या १५ वर्षांपासून सर्व पालखी मार्गांवर पर्यावरण जागृतीचा यशस्वी प्रयत्न करत आहेत.

वारी स्वच्छ, पर्यावरण सुरक्षित! ‘निसर्गवारी’ अभियानाची विठूरायाच्या चरणी १५ वर्षांची अखंड सेवा; कचरामुक्त वारीचा संकल्प

याच अभियानाचा एक भाग म्हणून, पुणे येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने निर्मल वारीच्या प्रसार व प्रचारासाठी एका भव्य ‘अभंगवाणी’ (भक्ती संगीत) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वारकरी, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

​या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी आपल्या सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करून या मोहिमेची सविस्तर माहिती दिली आहे, तसेच या कार्यात समाजाला सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे.

​थर्माकॉल आणि प्लास्टिकमुळे वारीला मोठा धोका

​कार्यक्रमादरम्यान वारीमध्ये वाढणाऱ्या प्लास्टिक आणि थर्माकॉलच्या वापराबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळातही वारी होती आणि लाखो वारकरी सहभागी व्हायचे, पण तेव्हा वनस्पतींच्या पानांपासून बनवलेल्या पारंपरिक पत्रावळ्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जायच्या.

ज्या सहज नष्ट होऊन त्यातून कंपोस्ट खत निर्मिती शक्य होती. मात्र, चकाचक करण्याच्या स्पर्धेत आता थर्माकॉल आणि प्लास्टिकचा वापर वाढला आहे. या पत्रावळ्यांचे विघटन होण्यासाठी ७५ ते १५० वर्षे लागतात. स्टीलच्या थाळ्या धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते, त्यामुळे त्याला पर्याय म्हणून थर्माकॉल वापरणे निसर्गासाठी आणि मानवी सृष्टीसाठी अत्यंत धोकादायक आहे.

​१५ वर्षांच्या मेहनतीतून उभा राहिला वटवृक्ष; कोट्यवधी पत्रावळ्यांचे वाटप

​प्रशांत अवचट यांनी रोवलेले हे जागृतीचे बीज आता एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. गेल्या ५-६ वर्षांत त्यांच्या संस्थेने पालखी मार्गावर सुमारे अडीच कोटी (२.५ कोटी) नैसर्गिक पत्रावळ्यांचे वाटप केले आहे. ज्यामुळे वारीतून अडीच कोटी थर्माकॉल आणि प्लास्टिकच्या पत्रावळ्या बाजूला करण्यात मोठे यश आले आहे.

​या मोहिमेला पुढे नेत, आजच्या कार्यक्रमात काही दिंडी प्रमुखांना प्रातिनिधिक स्वरूपात पत्रावळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, येत्या रविवारी सासवड येथे १० लाख पत्रावळ्यांच्या वाटपाचा मोठा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे.

​डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे आर्थिक सहकार्य आणि संकल्पाचे आवाहन

​कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, वारकरी आणि नागरिकांना संबोधित करताना डॉ. ढेकणे यांनी आवाहन केले की, केवळ वारीच्या काळातच नव्हे, तर दैनंदिन जीवनातही प्लास्टिक आणि थर्माकॉल न वापरण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. त्यांनी पुढे सांगितले की, एवढ्या मोठ्या अभियानासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.

‘थं क्रिएटिव्ह’च्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नागरिकांनी आपल्या सहकार्यातून किमान १,००० रुपये किंवा जमेल ती जास्तीत जास्त रक्कम दिलेल्या स्कॅनरवर पाठवून मदत करावी, जेणेकरून भविष्यातील निसर्गसंपन्न वारीच्या उपक्रमाला आपला हातभार लागेल आणि एक पुण्याचे काम आपल्या हातून घडेल.

​या विशेष प्रसंगी अभाविपचे (ABVP) राष्ट्रीय मंत्री श्री. शेखरजी (केरलम), सागर नेवसे, अनिल मस्के, अंबादास मेव्हणकर, महेश चिंचणी, मिलिंद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

विठू माऊलीच्या ओढीने निघाली ‘साहित्य दिंडी’; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पुस्तक वारी’चा दिमाखदार शुभारंभ!