ठळक बातम्या

निवडणुकीच्या उंबरठ्यावर डोंबिवलीकरांचा ‘एल्गार’; राजकीय पक्षांना धाडलं ‘प्रश्नांचं अस्त्र’!

डोंबिवली:
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. राजकीय आखाड्यात फोडाफोडीचे राजकारण आणि सभांचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असतानाच, आता सजग नागरिकही आक्रमक झाले आहेत. ‘शेजो उवाच’ च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘आमचा प्रश्ननामा’ ने राजकीय नेत्यांची झोप उडवली असून, “आधी प्रश्नांची उत्तरे द्या, मगच मतं मागा,” असा पवित्रा डोंबिवलीकरांनी घेतला आहे.

डोंबिवलीतील सेलिब्रिटी व मान्यवरांची नागरी प्रश्नांवर ‘अळी मिळी गुप चिळी’; ‘आंब्याचे टहाळे’ फक्त शोभेपुरतेच!

रिक्षाचालकांची मुजोरी: ‘मीटर’ कागदावरच का?

या प्रश्ननाम्यात सर्वाधिक रोख रिक्षा वाहतुकीच्या मनमानी कारभारावर आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) दर निश्चित केलेले असतानाही, शहरात सर्वत्र मीटर सक्ती का नाही, असा टोकदार प्रश्न विचारण्यात आला आहे. अवघ्या १.०५ किलोमीटरच्या अंतरासाठी २६ रुपयांऐवजी ५० ते ७० रुपये उकळणाऱ्या रिक्षाचालकांवर लोकप्रतिनिधींचा वचक का नाही? कोपर आणि ठाकुर्ली उड्डाणपुलाचे निमित्त करून प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका या निमित्ताने होत आहे.

कल्याण-डोंबिवलीत युती फिस्कटणार? प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे ‘स्वबळा’चे संकेत

बेकायदा फलकबाजी आणि शहराचे विद्रुपीकरण

दुसऱ्या बाजूला, शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या बेकायदा फलकबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. रस्त्यांचे नाव सांगणारे फलक झाकून स्वतःची ‘चेहरेबाजी’ करणाऱ्या नेत्यांना मतदारांनी थेट आरसा दाखवला आहे. शहराचे विद्रुपीकरण करणारी ही संस्कृती कधी थांबणार, असा प्रश्न विचारत नागरिकांनी राजकीय अहंकारावर प्रहार केला आहे.

सण-उत्सवांच्या नावाखाली रस्त्यांची कोंडी

दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात रस्ते अडवून मांडले जाणारे मांडव आणि रात्री १० नंतर होणारी फटाक्यांची आतिषबाजी व डीजेचा धिंगाणा यावरही नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली सर्वसामान्यांचे जगणे कठीण करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालणार का?” असा थेट सवाल उमेदवारांना विचारण्यात आला आहे.

शहराचा विकास होत नसेल, तर तेच चेहरे पुन्हा निवडून देऊ नका’; डोंबिवलीतील ‘महाचर्चा’ कार्यक्रमात नागरिकांचा एल्गार

फेरीवाल्यांचा विळखा आणि प्रशासकीय अनास्था

रेल्वे स्थानक परिसर आणि पादचारी पुलांवर फेरीवाल्यांनी मांडलेला ‘उच्छाद’ हा कल्याण-डोंबिवलीतील न संपणारा प्रश्न आहे. वर्षानुवर्षे आश्वासने देऊनही ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आता मत मागायला येणाऱ्या नेत्याला फेरीवालामुक्त स्थानक परिसरासाठी ठोस कृती कार्यक्रम विचारला जाणार आहे.

नागरिकांचा स्पष्ट संदेश:

“नेहमीप्रमाणे राजकीय पक्ष आपला जाहीरनामा घेऊन येतीलच, पण यंदा मतदारांनी आपला स्वतःचा ‘प्रश्ननामा’ तयार केला आहे. हा प्रश्ननामा म्हणजे राजकीय अनास्थेविरुद्धचा संताप आहे. जो उमेदवार या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देईल आणि परिवर्तनाचे आश्वासन देईल, त्यालाच कौल दिला जाईल.”

कल्याण-डोंबिवली पालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे ‘राष्ट्रासाठी’ मतदानाचे आवाहन

निष्कर्ष
कल्याण-डोंबिवलीची ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून ती नागरी सुविधांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. ‘आमचा प्रश्ननामा’ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, यामुळे यंदाच्या निवडणुकीत ‘विकासाच्या गप्पा’ मारणाऱ्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.

 

साभार – ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी यांच्या फेसबुक बॉल वरून