डोंबिवलीतील सेलिब्रिटी व मान्यवरांची नागरी प्रश्नांवर ‘अळी मिळी गुप चिळी’; ‘आंब्याचे टहाळे’ फक्त शोभेपुरतेच!
डोंबिवली:
सांस्कृतिक आणि साहित्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत आज नागरी समस्यांचा डोंगर उभा आहे. मात्र, शहरातील ज्या सेलिब्रिटी आणि मान्यवरांच्या शब्दाला समाजात मान आहे, त्यांनी या जळजळीत प्रश्नांवर ‘अळी मिळी गुप चिळी’ची भूमिका घेतल्याने संताप व्यक्त होत आहे. कोणत्याही कार्यक्रमात ‘आंब्याच्या टहाळ्या’प्रमाणे शोभेपुरते उपस्थित राहणारे हे मान्यवर जनतेच्या प्रश्नांवर मात्र मूग गिळून गप्प का, असा परखड सवाल ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी यांनी ‘शेजो उवाच- ७’ च्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
सांस्कृतिक मोठेपण फक्त मिरविण्यापुरतेच?
डोंबिवलीत दररोज होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना श्रोत्यांची आणि मान्यवरांची कमतरता नसते. शहरातील सेलिब्रिटींनी आपल्या कष्टाने विविध क्षेत्रांत नाव कमावले आहे, ही अभिमानाची बाब आहे. मात्र, त्यांचे हे मोठेपण केवळ सण, उत्सव, शोभायात्रा आणि पुरस्कार सोहळ्यांत मिरविण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
ज्वलंत प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष
शहरात फेरीवाल्यांचा विळखा, रिक्षाचालकांची मुजोरी, वाहतूक कोंडी, ६५ अनधिकृत इमारतींचा प्रश्न, पाणीटंचाई आणि जीवघेणा रेल्वे प्रवास यांसारखे अनेक प्रश्न गंभीर झाले आहेत. या प्रश्नांवर प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून सातत्याने आवाज उठवला जातो. मात्र, सत्ताधारी आमदार आणि खासदारांच्या निष्क्रियतेवर बोलण्याचे धाडस हे सेलिब्रिटी दाखवत नाहीत. त्यांनी विरोधात बोलावे असे नाही, पण किमान सकारात्मक हस्तक्षेपासाठी पुढाकार घेऊन प्रशासनावर दबाव निर्माण करावा, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.
“एखादा विषय ज्वलंत असतो, तेव्हा या मंडळींनी बोलायलाच हवे. सत्ताधारी तुमच्या शब्दाचा मान ठेवतील, पण तिथेही या ‘आंब्याच्या टहाळ्यांची’ उदासीनता दिसून येते.”
लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याची विटंबना आणि मौन
टिळकनगरमधील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे उदाहरण अत्यंत बोलके आहे. अनेक महिने हे काम रखडले होते. साक्षात लोकमान्यांचा पुतळा एखाद्या मृतदेहाप्रमाणे कापडात गुंडाळून ठेवला असतानाही, त्या परिसरात राहणाऱ्या एकाही सेलिब्रिटीने किंवा सार्वजनिक मंडळाने यावर चकार शब्द काढला नाही. व्हॉट्सॲप ग्रुपवर लेख पाठवूनही या मान्यवरांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले, ही बाब खेदजनक असल्याचे जोशी यांनी नमूद केले.
दुर्गाबाई भागवत आणि पु. भा. भावेंचा विसर?
एकेकाळी दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांनी नागरी प्रश्नांवर रस्त्यावर उतरून भूमिका घेतली होती. डोंबिवलीचेच सुपुत्र पु. भा. भावे यांनी आपल्या लेखणीतून प्रस्थापित व्यवस्थेवर प्रहार केले होते. मात्र, आजच्या पिढीतील मान्यवरांना या थोर वारशाचा विसर पडला आहे का, अशी चर्चा रंगत आहे.
३० वर्षांपूर्वी वर्तवलेली भीती आज सत्य ठरत आहे. जर आजची सेलिब्रिटी मंडळी आणि मान्यवर या समस्यांवर गप्प राहिली, तर भविष्यातील पिढी त्यांना कधीही क्षमा करणार नाही, असा इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या ‘आंब्याच्या टहाळ्यांची’ ही अनास्था शहराला कुठल्या दिशेला घेऊन जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
साभार – शेखर जोशी यांचा फेसबुक बॉल वरून
