माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना ‘ब्रह्मभूषण’ पुरस्कार प्रदान; डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई, ११ डिसेंबर २०२५:
दादरस्थित सुप्रसिद्ध ब्राह्मण सेवा मंडळाच्या १०९ व्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘ब्रह्मभूषण’ पुरस्कार २०२५ यंदा लोकसभेच्या माजी अध्यक्षा तथा पद्मभूषण श्रीमती सुमित्रा महाजन यांना प्रदान करण्यात आला. १० डिसेंबर २०२५ रोजी मंडळाच्या वास्तूत हा शानदार पुरस्कार सोहळा पार पडला.
विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या ज्ञातीतील व्यक्तीस हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. आर.डी. लेले, लेफ्टनंट जनरल शेकटकर आणि डॉ. जयंत नारळीकर यांसारख्या दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

प्रेरणादायी राजकीय वाटचाल
नगरसेविका म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून थेट लोकसभा अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेल्या सुमित्रा महाजन यांची वाटचाल अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे. सलग आठ वेळा एकाच मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सर्वाधिक काळ लोकसभा सदस्य असणाऱ्या त्या एकमेव महिला खासदार आहेत. ‘इंदूरच्या ताईं’च्या या कार्याचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्यात मंडळाचे उपाध्यक्ष श्री. अनिरुद्ध गोडसे यांच्या हस्ते सुमित्रा महाजन यांना महावस्त्र, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व अर्पणराशी देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे मार्गदर्शन
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. त्यांनी सुमित्रा महाजन यांच्या प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय कार्याचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, त्यांच्यातील नवनवीन गोष्टी शिकण्याच्या जिज्ञासू स्वभावाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
पुरस्काराला उत्तर देताना सुमित्रा महाजन यांनी अत्यंत नम्रपणे सांगितले की, त्यांच्यावर लहानपणापासून आई-वडील आणि अनेक मान्यवरांच्या सहवासात झालेल्या संस्कारांचा त्यांच्या संपूर्ण वाटचालीत उपयोग झाला आणि आजचा सन्मान हे त्याच संस्कारांचे फलित आहे.

या कार्यक्रमाला अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. व्यासपीठावर ब्राह्मण सेवा मंडळाचे प्रमुख कार्यवाह योगेश केळकर, कार्यकारी विश्वस्त दिलीप शेटे आणि कार्याध्यक्ष अजय काळे यांची उपस्थिती होती.
ब्राह्मण सेवा मंडळाचा २०२५ चा “ब्रम्हभूषण” पुरस्कार लोकसभेच्या माजी अध्यक्षा पद्मभूषण सुमित्रताई महाजन यांना माजी खासदार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनयजी सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंडळाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध गोडसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
