रासरंग २०२५: डोंबिवलीत शारदीय नवरात्रोत्सवाचा थाटामाटात होणार शुभारंभ
डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला ‘रासरंग’ शारदीय नवरात्र उत्सव यंदा १० व्या वर्षात पदार्पण करत आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत डी.एन.सी. रोडवरील शाळेच्या मैदानावर हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
भव्य उद्घाटन सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम:
उत्सवाची घटस्थापना २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता होईल. त्याच दिवशी सायंकाळी ६:०० वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नऊ रंगी फुगे आसमंतात सोडून उत्सवाचे उद्घाटन केले जाईल. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या उत्सवात दररोज सायं. ७:३० ते १०:०० या वेळेत प्रसिद्ध तबलावादक व संगीतकार नैतिक नागदा यांच्या ऑर्केस्ट्रासह दांडिया-गरबा महोत्सव होणार आहे, ज्यात मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी होणार आहेत.
महिला सबलीकरण आणि पुरस्कार:
महिलांच्या सन्मानासाठी दररोज रात्री ८:३० वाजता विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या महिलांना ‘नवदुर्गा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. तसेच, महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता भोंडला सोहळा आणि ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० वाजता कुमारीका पूजन व कुंकुमार्चन सोहळा होणार आहे.
सामाजिक बांधिलकीचा गौरव:
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामांसाठी ओळखले जाते. या उत्सवाच्या माध्यमातून डॉ. शिंदे यांचे जनतेवरील प्रेम आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या विकासातील योगदान अधोरेखित होत आहे. या उत्सवाचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक दुर्गाभक्त, युवक-युवती आणि गरबा-प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
पार्किंगची विशेष व्यवस्था:
उत्सवासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी डीएनसी रोडवरील श्री स्नेहांकित मित्र मंडळाच्या कमानीशेजारील भूखंड आणि कलावती आईच्या मठासमोर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
