दादरमध्ये ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव – ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन मुख्य आकर्षण
मुंबई (प्रतिनिधी): दादर (प.) येथील ख्यातनाम ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव यंदा भव्यदिव्य आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. शतकपूर्तीनिमित्ताने आयोजित या सोहळ्यात विविध सांस्कृतिक, ज्ञानवर्धक आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत असून, रसिक गणेशभक्तांना अविस्मरणीय अनुभव मिळत आहे.
या सोहळ्याचा समारोप भक्तिरसाने ओथंबून वाहणाऱ्या कीर्तनाने होणार आहे. लोकप्रिय कीर्तनकार ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील यांच्या मधुर वाणीतून वारकरी कीर्तन शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता, ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड, दादर (प.) येथे पार पडणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, अधिकाधिक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
डोंबिवलीत ‘ब्राह्मण महासंघ ग्राहक पेठ एक्स्पो 2025’चे आयोजन
श्री. पाटील हे सध्या सोनी मराठीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे मुख्य परीक्षक आहेत. त्यांनी मुंबईजवळील सरलांबे येथे श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय स्थापन करून वारकरी परंपरेच्या प्रसारासाठी मोठे योगदान दिले आहे.
ब्राह्मण सेवा मंडळाचा पहिला श्री गणेशोत्सव ११ ते २० सप्टेंबर १९२६ रोजी मुकुंद मॅन्शन येथे झाला होता. स्थापनेपासून मंडळाने शंभर वर्षांत अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक दिग्गज कलाकार, नामवंत व्याख्याते आणि मान्यवरांनी या मंचावर आपली कला व विचार सादर केले आहेत.
यंदाच्या शतकोत्सवी सोहळ्यात लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे, स्पृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे, निनाद सोलापूरकर, गंधार जोग, अंजली मराठे यांसह अनेक कलावंतांनी आपल्या कलाकृतींनी रंग भरला. तसेच माजी लष्कर अधिकारी ले. ज. विनायक पाटणकर (नि.) व मा. ले. ज. एस. एस. हसबनीस (नि.) यांची ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’ या विषयावरील विशेष मुलाखत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी सादर केली.
दरम्यान, प्रख्यात गायिका राणी वर्मा, संगीतकार कौशल इनामदार आणि विविध राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि शतकोत्सवी गणेशोत्सवाला उपस्थिती लावली.
