Sunday, December 14, 2025
Latest:
साहित्य- सांस्कृतिक

ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकमहोत्सवी गणेशोत्सव: सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

ब्राह्मण सेवा मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरणार आहे. कारण यंदा हा उत्सव शतकमहोत्सवी वर्ष साजरा होत आहे. १९१६ मध्ये स्थापना झालेल्या या संस्थेने १९२६ मध्ये पहिला गणेशोत्सव साजरा केला होता. तेव्हापासून अव्याहत परंपरा टिकवत यंदा सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांसाठी सजली आहे.

या शतकमहोत्सवी वर्षी ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’, ‘संकर्षण via स्पृहा’ आणि ‘हसले मनी चांदणे’ असे खास कार्यक्रम रसिकांसमोर येणार आहेत.

२९ ऑगस्ट २०२५ रोजी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ हा पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांच्या आयुष्यावर आधारित काव्यमय नाट्यप्रयोग होणार आहे. यामध्ये कथा, कविता, रेखाचित्रे, संगीत व गायनाचा सुंदर संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.

१ सप्टेंबर २०२५ रोजी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांची लोकप्रिय जोडी ‘संकर्षण via स्पृहा’ या साहित्य व मनोरंजनाच्या मैफिलीत कवितांपासून किस्स्यांपर्यंत रंग भरून टाकणार आहे.

३ सप्टेंबर २०२५ रोजी पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘हसले मनी चांदणे’ हा कार्यक्रम होईल. यामध्ये त्यांची कन्या वंदना गुप्ते, राणी वर्मा तसेच अन्य सदस्य सहभागी होणार आहेत.

इतर खास कार्यक्रम

३० ऑगस्ट: ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’, व्याख्याते – ले. ज. विनायक पाटणकर (नि.), ले. ज. एस. एस. हसबनीस (नि.). मुलाखतकार – उदय निरगुडकर.

३१ ऑगस्ट: ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’, प्रद्योत पेंढारकर यांचे मार्गदर्शन.

५ सप्टेंबर: वारकरी कीर्तन – ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील.

पारंपरिक धार्मिक कार्यक्रम

गणेशोत्सवात धार्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी श्री गणेश याग, श्री गणेश अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन, महाप्रसाद आणि विसर्जनाची भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.

रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य

हे सर्व कार्यक्रम ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड, दादर (प), मुंबई २८ येथे होणार असून सर्व रसिकांना हे कार्यक्रम विनामूल्य पाहता येणार आहेत. काही रांगा मात्र आरक्षित असतील.

ब्राह्मण सेवा मंडळाच्या या शतकमहोत्सवी उत्सवात धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजनात्मक रंगांची बहार रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.