आपल्या मातृभाषांबाबत आपणच उदासीन – राज्यपाल रमेश बैस
मध्य व पश्चिम क्षेत्रीय केंद्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान
मुंबई दि.२३ – आपणच आपल्या मातृभाषांबाबत उदासीन आहोत. हिंदी चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्री नेहमी इंग्रजीतच बोलतात. हे दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आयोजित क्षेत्रीय राजभाषा संमेलनाचे उदघाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध केंद्रीय संघटना, बँक व उपक्रमांना २०२२- २३ वर्षाचे क्षेत्रीय राजभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा, राजभाषा विभागातील सचिव अंशुली आर्य, राजभाषा सहसचिव डॉ मीनाक्षी जौली, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भुवन चंद्र पाठक तसेच राजभाषा विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच निमंत्रित यावेळी उपस्थित होते.
अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आपल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना घरी देखील इंग्रजीतूनच संवाद करण्याचे सांगतात. हिंदी किंवा मराठी भाषेत बोलणाऱ्याकडे हीन दृष्टीने पाहिले जाते. परिणामतः मुले आपल्या मातृभाषेत किंवा हिंदीत बोलण्यास कचरतात असे राज्यपाल बैस म्हणाले. हिंदी भाषेचा अनेकदा राजकीय हत्यार म्हणून वापर केला जातो. ही भाषा राजभाषा होण्यात वैधानिक, शैक्षणिक व व्यावहारिक आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करून सन २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भाषेचे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी केले.
केंद्रीय विद्यालय संगठन, रायपूर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड भोपाल, केंद्रीय उत्पाद सीमा शुल्क, जबलपूर, हिंदुस्थान पेट्रोलियम, मनेरी, बँक ऑफ बडोदा, रायपूर, समुद्री उत्पात निर्यात विकास प्राधिकरण, मुंबई, दीपस्तंभ और दीपपोत महानिदेशलाय, मुंबई, आयकर आयुक्त कार्यालय, नागपूर, इंडियन ऑइल, बांद्रा, मुंबई, बँक ऑफ बडोदा बडोदा, मुंबई बँक, समुद्री वाणिज्य विभाग, मोरमुगाव, मौसम विज्ञान केंद्र, पणजी आदींना मध्य व पश्चिम क्षेत्रांचे राजभाषा पुरस्कार देण्यात आले.