निःशुल्क आरोग्य सेवेसाठी महापालिकाह रुग्णालयात “झिरो प्रिस्क्रिपशन पॉलिसी” राबवावी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महापालिका आयुक्तांना सूचना
मुंबई दि.२३ – बृहन्मुंबई महापालिका रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी “झिरो प्रिस्क्रिपशन पॉलिसी” राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना केली. ही योजना राबविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या औषधे व संसाधने खरेदी प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
गरीब रुग्णांवर या खर्चाचा अतिरिक्त बोजा पडतो. आरोग्य उपचारावर होणाऱ्या (आऊट ऑफ पॉकेट एक्सपेंडीचर) खर्चामुळे साधारणतः १० टक्के नागरिक दारिद्रय रेषेखाली खेचले जातात. राष्ट्रीय स्तरावर विविध संस्थांनी केलेला अभ्यास व संशोधनातून निदर्शनास आल्याचे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.महापालिकेमार्फत ४ वैद्यकीय महाविद्यालये, १ दंत महाविद्यालये, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये, ३० प्रसूतिगृहे, १९२ दवाखाने सुरू आहेत.
याखेरीज २०२ बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” देखील कार्यरत आहेत. या वैद्यकीय व्यवस्थेतील रुग्णालयांमध्ये ७१००, उपनगरीय रुग्णालयामध्ये ४०००, विशेष रुग्णालयात ३००० व इतर अशा एकूण सुमारे १५ हजार रुग्णशय्या आहेत. यामध्ये ५० हजार पेक्षा अधिक रुग्ण दररोज बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घेतात. तसेच, वार्षिक सरासरी २० लाख पेक्षा अधिक रुग्ण आंतर रुग्ण सेवेचा लाभ घेतात.