मुंबई विद्यापीठाला नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परवानगीचे बंधन नाही
विद्यापीठाला वर्ग १ श्रेणी स्वायत्ततेचा दर्जा बहाल
मुंबई दि.२३ – मुंबई विद्यापीठाला नवीन अभ्यासक्रम, संकुले सुरू करण्यासाठी आता विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) परवानगी घेण्याचे बंधन राहणार नाही. यूजीसीने वर्ग १ श्रेणी स्वायत्ततेचा (ग्रेडेड ऑटोनॉमी) दर्जा बहाल केला आहे.
राज्यात नॅककडून सर्वाधिक श्रेणी देण्यात आलेल्या विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे. विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणी आणि ३.६५ सीजीपीए गुणांकन मिळाले आहे. त्यामुळे विद्यापीठ वर्ग १ श्रेणी स्वायत्तता मिळविण्यासाठी पात्र ठरले आहे.
विद्यापीठाला नवीन ऑनलाइन अभ्यासक्रम आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेमार्फत (आयडॉल) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीही यूजीसीच्या मान्यतेची गरज पडणार नाही. यूजीसीने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता होताच विद्यापीठाला कोणत्याही मान्यतेविना हे अभ्यासक्रम सुरू करण्याची मुभा मिळणार आहे.