एसटी बस स्थानकावर महिला बचत गटासाठी स्टॉल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आपला दवाखाना सुरू होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२३ – राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकावर ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हे आदेश दिले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नवीन वर्षांत ३ हजार ४९५ एसटी बसेस दाखल होणार असून बस स्थानकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरामोहरा बदलण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत ५१५० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून जिल्हा आणि तालुकास्तरावर त्यांची सेवा देण्यात येणार आहे. या बससेवेचे तिकीट दर सामान्यांना परवडेल असेच ठेवण्याचे आदेशही या वेळी देण्यात आले.