‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आढावा
मुंबई दि.१७ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रम राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी काल झालेल्या बैठकीत हा आढावा घेण्यात आला. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध शासकीय विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते. ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रमाच्या नमो महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या राज्यातील ६० लाख महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या असून ही संख्या २ कोटी करण्यासाठी ग्रामविकास, महिला व बालविकास विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
महापालिका, नगरपालिकेच्या विविध ७२ बाजारपेठांमध्ये महिला उद्योग केंद्रांसाठी जागा दिली जाणार असून इतरही शहरांमध्ये अशा प्रकारची जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मॉलमध्येही बचत गटांच्या उत्पादनांची विक्री व्हावी, त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने विभागाने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन
देशाच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या हातांचा सन्मान करण्यासाठी ‘नमो कामगार कल्याण’ अभियानातून ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. तीन महिन्यात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल. ‘नमो शेततळी’ अभियानातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचा प्रयत्न असून त्यासाठी ७३०० शेततळ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. या अभियानातून राज्यातील ७३ गावे आत्मनिर्भर गावे विकसित करण्यात येणार असून त्यासाठी पक्की घरे, शौचालयांची बांधणी व त्याचा वापर, रस्त्यांचे जाळे, महिला सक्षमीकरण, गावातच रोजगाराची उपलब्धता, सौर ऊर्जेचा वापर आदी बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.