टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ऋणानुबंध सोहळा! – आजी-माजी कार्यकर्त्यांचे संम्मेलन
डोंबिवली, दि. ९
अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ऋणानुबंध सोहळा रविवारी टिळकनगर विद्या मंदिर शाळेच्या पेंढरकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मंडळाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या सर्व आजी-माजी कार्यकर्त्यांचे अनोखे संम्मेलन पार पडले. वयवर्ष ८० ते १८ असे तीन पिढ्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. अशाप्रकारचे आजी-माजी कार्यकर्त्यांचे संम्मेलन भरविणारे टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पहिलेच मंडळ असेल, असे मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष सुशील भावे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
१९५० साली मंडळाची स्थापना झाल्यानंतर काळानुरूप उपक्रमांमध्ये, गणेशोत्सव सादरीकरणामध्ये घडलेले स्थित्यंतर, मंडळाने साध्य केलेले यशस्वी टप्पे, अमृतमहोत्सवी वर्षातील आगामी उपक्रम याची माहिती मंडळाचे माजी अध्यक्ष संदिप वैद्य यांनी दिली.
मंडळाच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून माजी टिळकनगरवासिय, टिळकनगराच्या माहेरवाशिणी, टिळकनगरात नव्याने राहण्यास आलेले रहिवासी यांच्यासाठी स्वतंत्र संमेलन आयोजित करण्याचा विचार असल्याचे मंडळाचे उपाध्यक्ष व सनदी लेखापाल सचिन आंबेकर यांनी सांगितले.
आगामी काळात सहा सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनिधीतून काश्मिर येथील दोन शाळांना विज्ञान प्रयोगशाळा बांधून देणे, टिळकनगरवासियांची रक्तगट सुची तयार करणे, स्वच्छ टिळकनगर-सुंदर टिळकनगर यासारखे अभिनव उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
काही माजी कार्यकर्ते, मंडळाचे कार्यवाह बल्लाळ केतकर, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी अध्यक्ष सुहास दांडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या संमेलनास पुणे, मुंबई, नवी मुंबई, टिटवाळा, कर्जत आदी ठिकाणांहून आजी, माजी कार्यकर्ते उपस्थित होते.
——