ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय शहरे विकास मंत्र्यांची भेट
मुंबई दि.०७ :- वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ‘ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प’ काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासमोर मांडला. केंद्रीय गृह मंत्रालयाने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेतली.
अपंग व्यक्तींना योग्य संधी आणि व्यासपीठ देण्याची गरज : राज्यपाल रमेश बैस
त्यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या नागरी भागातील विविध मूलभूत आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा करताना मेट्रो कोचची संख्या वाढवावी अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. या भेटीत मुख्यमंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांसमवेत ठाणे मेट्रोविषयी सविस्तर चर्चा झाली. ठाणे शहरात सध्या दोन मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. शहराचा विस्तार होत असून तसेच शहर-जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे. ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावरुन ७ ते ८ लाख प्रवाशांची वर्दळ आहे.
त्यामुळे २९ किमी लांबीचा ठाणे रिंग मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी केंद्राला सादर केला असून त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी करतानाच मेट्रो कोचची संख्या वाढविण्याची विनंतीही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. एकूण २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २६ किमी लांबीचा मार्ग हा इलेव्हेटेड असून ३ किमीचा मार्ग हा भूमिगत आहे. प्रकल्पांर्गत एकूण २२ स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.