स्वच्छता अभियान ‘लोकचळवळ’ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२६ :- स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी१ ऑक्टोबरला ‘स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून त्याचा आढावा घेण्यात आला.
त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यावेळी सहभागी झाले होते. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन करतानाच राज्यात दि. १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीच्या बाहेरचा भागात नेहमी कचऱ्याचे ढीग, डेब्रीज टाकलेले असते. अशा महापालिका हद्दीबाहेरच्या जागा शोधून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिम राबवावी. त्यासाठी मुख्य सचिवांनी आढावा घेण्याचे सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. येत्या १ ऑक्टोबरला आपापल्या गावात, शहरात, प्रत्येक प्रभागात सकाळी दहा वाजल्यापासून स्वच्छता मोहीम राबवावी, या त्या भागातील सर्व नागरिकांना सहभागी करून घ्यावे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.