Skip to content
मुंबई दि.०४ :- ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला ला नाही तर मुंबईकरांना पुन्हा पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांमधून दररोज ३ हजार ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात धरणक्षेत्रात केवळ १३ लाख १२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
जुलै महिन्यात तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर तलाव पूर्ण ओसंडून वाहू लागले होते. मात्र, आता तुळशी, तानसा, मोडकसागर या तलावांमध्ये पुन्हा काही प्रमाणात पाणी पातळी कमी झाली आहे. येत्या १ ऑक्टोबरला सातही तलावांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.