Skip to content
लोणावळा दि.२८ :- माणसाचे जीवनमान उंचाविण्यात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता योग साधनेत आहे. व्यापक अर्थाने आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शांतता स्थापित करून ‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दीष्ट गाठण्यातही योग उपयुक्त आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. लोणावळा येथील कैवल्यधाम योगसंस्थेतर्फे आयोजित ‘स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार-२०२३’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाला सीबीआयचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ.डी.आर. कार्तिकेयन, कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, सहव्यवस्थापक डॉ.आर.एस.भोगल, हृषिकेश येथील स्वामी राम साधक ग्रामचे स्वामी रित्वन भारती, रवी दिक्षीत आदी उपस्थित होते. योग केवळ निरोगी शरिरासाठीचा व्यायाम नसून ही शरीर, मन आणि आत्म्याशी संलग्न असलेली प्रक्रीया आहे. ती एक निरोगी जीवन जगण्याची शैली असून योगसाधनेचे अंतिम उद्दीष्ट आंतरिक शांती, सद्भावना आणि आत्मसंयमाचा विकास आहे.
त्यामुळे विविध प्रकारांच्या आजारांचे प्रमाण वाढत असतांना आणि युवा पिढी व्यसनाकडे वळत असतांना योगविद्येचा प्रसार अधिक महत्वाचा ठरतो, असे राज्यपाल बैस यांनी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री डॉ.डी.आर. कार्तिकेयन, स्वामी रित्वन भारती यांना कुवल्यानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमपूर्वी राज्यपालांनी कैवल्यधाम योग संस्था परिसरास भेट दिली आणि तेथील ग्रंथालयाच्या कामकाजाची माहिती घेतली.