Skip to content
‘शासन आपल्या दारी’ सारख्या क्रांतीकारी योजनेच्या माध्यमातून सव्वाकोटी रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक मदत नागरिकांना करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मुंबईत मंत्रालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात पीक विम्याचा लाभ घेतल्याची नोंद झाली आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी नियमाबाहेर जाऊन मदत केली असून आजपर्यंत साडेबारा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत शेतकऱ्यांना देण्यात आली असल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
‘नमो शेतकरी’ महासन्मान निधी योजनेत केंद्राच्या ६ हजार रुपयांमध्ये राज्यातर्फे आपण ६ हजार रुपयांची भर घातली असून आता दरवर्षी १२ हजार रुपये प्रति शेतकऱ्याला मिळणार आहेत. एक कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे. रखडलेल्या ३५ जलसिंचन योजना प्रकल्पांना आपण चालना दिली. त्यामुळे ८ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.