डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाने देशासाठी सर्वोत्कृष्ट शिक्षक घडवावेत- राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. २०
डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाने शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रात अधिक काम करुन जगासाठी उत्कृष्ट शिक्षक घडवावेत आणि देशातील पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे केले.
राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डाॅ. विनय सहस्रबुद्धे दीक्षांत समारोहाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
गेल्या काही वर्षात रोजगार क्षेत्रात प्रचंड बदल झाले आहेत. आज नोकरीतील प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचे वर्षाला आणि महिन्यालाच नव्हे तर प्रकरण निहाय मूल्यांकन केले जाते. मात्र, आज उद्यमशीलतेला प्रोत्साहन व चालना दिली जाते. युवकांनी उद्यमशील व्हावे व आपापल्या क्षेत्रात नेतृत्व करावे असेही राज्यपाल बैस यांनी सांगितले.
भारतीय विद्यापीठे देशाबाहेर जात आहेत आणि बाहेरची विद्यापीठे भारतात येत आहेत. उच्च शिक्षणातील या जागतिकीकरणाचे स्वागत झाले पाहिजे कारण त्यामुळे ज्ञानाचे आदानप्रदान वाढून शिक्षण क्षेत्रातील एकाधिकारशाही संपुष्टात येईल असे प्रतिपादन डॉ विनय सहस्रबुद्धे यांनी केले.
आजचे जग हे सर्वांना समान संधी देणारे व्यासपीठ झाले आहे, हे खरे असले तरीही भारतीय लोकांनी आपली भाषिक व सांस्कृतिक विविधता कायम राखून भारतीयता जपली पाहिजे. आधुनिकता म्हणजे पाश्चात्यांचे अंधानुकरण नाही. युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नव्या गोष्टींचा स्वीकार करून विकसित व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे असे आवाहनही सहस्रबुद्धे यांनी केले.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजनीश कामत यांनी विद्यापीठाच्या अहवालाचे वाचन केले. दीक्षांत समारंभात विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, आंतरशाखीय अभ्यासक्रम व मानव्यविद्या शाखांमधील एकुण १५४५ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्रदान करण्यात आल्या.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, डॉ होमी भाभा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका विजया येवले, कुलसचिव युवराज मलघे तसेच विविध विभागाचे प्रमुख, आजी – माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. डॉ नितीन आरेकर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ युवराज मलघे यांनी आभार मानले.
——–
