लाच देणाऱ्यालाही आरोपी करा – समीर वानखेडे यांची न्यायालयात मागणी
मुंबई, दि. ६
आपल्याविरोधात दाखल केलेल्या लाच प्रकरणात लाच देणाऱ्यालाही आरोपी करावे, अशी मागणी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) पश्चिम विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी बुधवारी उच्च न्यायालयात केली.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी वानखेडे यांनी ही मागणी केली.
वानखेडे यांचे वकील आबाद पोंडा, स्नेहा सानप यांनी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठाकडे ही मागणी केली. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या सुधारित कलमांतर्गत सार्वजनिक सेवकाला अनुचित फायदा मिळवण्यासाठी लाच देणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करण्याची तरतूद आहे.
या कलमांनुसार लाच देणारी व्यक्तीही कारवाईसाठी पात्र असल्याचे वानखेडे यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले.
——-
