करोना केंद्र कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे मुंबईत १५ ठिकाणी छापे
मुंबई, दि. २१
करोना केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) मुंबईत आज १५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांच्या तसेच एका सनदी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेवर छापा टाकला आहे.
सुजीत पाटकर यांच्यासह आणखी तिघांविरोधात या आधी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लाईफ लाईन रुग्णालयाच्या व्यवस्थापन सेवेसह डॉ हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते.
—
