राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारण्यासाठी मध्यवर्ती यंत्रणा उभारणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १५
महाराष्ट्र ही नाट्यपंढरी असून मराठी रंगभूमी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. त्यामुळे राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारण्यासाठी मध्यवर्ती यंत्रणा तयार केली जाईल, अशी घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (बुधवारी) येथे केली.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या गोविंद देवल बल्लाळ पुरस्कारांचे वितरण तसेच नूतनीकरण झालेल्या यशंवतराव चव्हाण नाट्य संकुलाच्या उदघाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
यासाठी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल तसेच निधीची व्यवस्थाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नूतनीकरण झालेल्या नाट्य संकुलाच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणासाठी १० कोटी रुपये देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. आगामी शंभराव्या नाट्य संमेलनाचे आयोजन भव्य-दिव्य होण्यासाठी चांगले नियोजन करण्यात यावे, त्याला शासनस्तरावरून सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राहूल शेवाळे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, परिषदेचे कार्यकारिणी सदस्य अजित भुरे, शशी प्रभू, सतिश लटके, नरेश गडेकर, गिरीष गांधी, भाऊसाहेब भोईर, विजय चौगुले आदी उपस्थित होते.
——
