ठळक बातम्या

शरद पवार यांना समाज माध्यमावर जीवे मारण्याची धमकी

मुंबई दि. ९ जून
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समाज माध्यमातून ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी देण्यात आली आहे.

या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

समाज माध्यमावर आलेल्या त्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स पोलीस आयुक्तांना देण्यात आली. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान राज्याच्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक प्रश्नावर मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुणी धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद करू शकेल असे वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. याची जबाबदारी महाराष्ट्र प्रशासनावर आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी स्वतः बोललो आहे. तसेच त्यांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सोशल मीडियावर व्यक्त होत असताना कोणत्याही नेत्याला धमकावणे किंवा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे ही बाब खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकरणात पोलीस नक्कीच कायदेशीर कारवाई करतील,
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *