गांजले ते गाजले’ पुस्तक म्हणजे गंगाराम गवाणकर यांच्या नाटकांमागचा इतिहास उलगडणारा दस्तऐवज – ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांचे प्रतिपादन
बोरिवली, दि. ८
नाटककार गंगाराम गवाणकर यांनी लिहिलेले ‘गांजले ते गाजले ‘ हे पुस्तक म्हणजे गवाणकर यांच्याच प्रकाशित – अप्रकाशित नाटकांमागचा इतिहास उलगडणारा मिश्किल भाषेतील दस्तऐवज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी बोरिवली येथे केले.
डिंपल पब्लिकेशनतर्फे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या “गांजले ते गाजले’ आणि दशवतारावर पाहिले संशोधन केलेले डॉ.अशोक भाईडकर यांच्या “व्हर्जिन’ या मराठी आणि इंग्रजी कादंबरीचा प्रकाशन समारंभ प्रबोधनकार ठाकरे मीनी नाट्यगृहात पार पडला. त्यावेळी प्रा. बागवे बोलत होते.
वसई विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील, डॉ.सुनीता चव्हाण, अभिनेते डॉ.गिरीश ओक, प्रमोद पवार, प्रदीप कबरे, अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डिंपल प्रकाशनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला दोन महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे, ही आनंदाची गोष्ट असल्याचे डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळ्ये यांनी प्रास्ताविकात सांगितले.
मराठी भाषेचे अस्तित्व टिकविण्यासाठी इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमांच्या शाळांमध्ये उच्च श्रेणीचे मराठी अभ्यासक्रमात सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचे हवे, असे राजीव पाटील म्हणाले. डॉ . सुनीता चव्हाण यांचेही भाषण झाले.
ज्येष्ठ अभिनेते डॉ . गिरीश ओक , प्रमोद पवार , प्रदीप कबरे , अभिनेत्री डॉ . श्वेता पेंडसे यांनी गंगाराम गवाणकर यांच्या पुस्तकातील उताऱ्यांचे अभिवाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले.
—–
