सूर्याचा उद्या मृग नक्षत्रात प्रवेश !
मुंबई, दि. ७
सूर्याचा उद्या ( गुरुवार ८ जून) संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी मृग नक्षत्रात प्रवेश होणार असून या नक्षत्राचे वाहन हत्ती आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करील, त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्रनक्षत्रापर्यंत नक्षत्रसंख्या मोजली जाते. त्या संख्येस नऊने भागले की जी बाकी राहील त्यावरून नक्षत्राचे वाहन कोणते आह? ते काढता येते, असे सोमण यांनी सांगितले.
घोडा वाहन असेल पर्वतावर पाऊस पडतो, कोल्हा, मेंढा वाहन असता पाऊस अत्यल्प तर मोर, गाढव व उंदीर वाहन असेल तर अल्प आणि अनियमित पाऊस पडतो. बेडूक, म्हैस आणि हत्ती वाहन असेल तर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, असे पारंपरिक अंदाज/ आडाखे आहेत. पंचांगाप्रमाणे यावर्षी सर्वसाधारणपणे सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, असे सोमण यांनी सांगितले.
प्राचीनकाळी शेतक-यांनी पर्जन्यसूर्य नक्षत्रांना पडणा-या पावसाप्रमाणे गमतीशीर नावेही ठेवली. पुनर्वसू नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘ तरणा पाऊस ‘, पुष्य नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘ म्हातारा पाऊस ‘, आश्लेषा नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘आसळकाचा पाऊस ‘, मघा नक्षत्रात जोरदार पाऊस पडतो म्हणून मघा नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘ सासूंचा पाऊस ‘ असे म्हणतात तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘ सूनांचा पाऊस ‘ म्हणतात.
उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पडणा-या पावसाला
‘रब्बीचा पाऊस ‘, हस्त नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘ हत्तीचा पाऊस ‘ तर चित्रा नक्षत्रात पडणा-या पावसाला ‘आंधळीचा पाऊस ‘असे म्हणतात अशी माहितीही सोमण यांनी दिली.
यावर्षींचा सूर्यनक्षत्रप्रवेश आणि वाहने पुढील प्रमाणे.
आर्द्रा- गुरुवार दि. २२ जून सायं. ५-४७ वाहन मेंढा.
पुनर्वसू- गुरुवार दि. ६ जुलै सायं. ५-२५ वाहन गाढव.
पुष्य- गुरुवार दि. २० जुलै सायं. ४-५४ वाहन बेडूक.
आश्लेषा- गुरुवार दि. ३ ॲागस्ट दुपारी ३-५१ वाहन म्हैस.
मघा- गुरुवार दि. १७ ॲागस्ट दुपारी १-३२ वाहन घोडा.
पूर्वा फाल्गुनी- गुरुवार दि. ३१ ॲागस्ट सकाळी ९-३० वाहन मोर.
उत्तरा फाल्गुनी- बुधवार दि. १३ सप्टेंबर उत्तररात्री ३-२४ वाहन हत्ती.
हस्त- बुधवार दि. २७ सप्टेंबर सायं. ६-५४ वाहन बेडूक.
चित्रा- बुधवार दि. ११ आक्टोबर सकाळी ७-५८ वाहन उंदीर. स्वाती- मंगळवार दि. २४ आक्टोबर सायं. ६-२५ वाहन घोडा.
बाकी आलेली संख्या आणि नक्षत्र वाहन खालीलप्रमाणे
१. घोडा, २ कोल्हा, ३ बेडूक, ४ मेंढा, ५ मोर, ६ उंदीर, ७ म्हैस, ८ गाढव आणि शून्य बाकी राहिली तर हत्ती वाहन समजले जाते.
———
