वाहतूक दळणवळण

Dombivli Rikshaw : डोंबिवली पश्चिम ते सावित्रीबाई फुले नाट्यगृह… सांगितले १०० रुपय, ८० रुपयांवर तयार झाला आणि मीटरने झाले फक्त ४८ रुपये…

शेखर जोशी

काल ४ जून रोजी डोंबिवली पश्चिम, टी. जे. एस. बी. (बॅंक) येथून सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली पूर्व येथे जाण्यासाठी उभे होतो. दुपारची उन्हाची वेळ असल्याने रिक्षाने जायचे ठरविले.

डोंबिवलीतील रिक्षावाले. मीटर न टाकता मनमानी पद्धतीने वाटेल तसे भाडे आकारणारे. मीटर टाका सांगितले तर मीटर टाकत नाहीत, टाकायची पद्धत नाही, असे उर्मटपणे खुशाल सांगणारे. वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) रिक्षा चालक मालक संघटना यांच्या लेखी डोंबिवलीत मीटर पद्धत सुरू आहे. ज्या प्रवाशांना मीटरने जायचे आहे त्यांनी मीटरने जायचे आहे सांगितले तर रिक्षाचालकांनी मीटर टाकले पाहिजे (ही आदर्श पद्धत) पण डोंबिवलीतील सर्व रिक्षाचालक हा नियम धाब्यावर बसवितात आणि मनाला येईल ते पैसे सांगतात. ना वाहतूक पोलीस, ना प्रादेशिक परिवहन अधिकारी, ना रिक्षा चालक मालक संघटनांचे पदाधिकारी ( जे बहुतांश सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आहेत) किंवा परिवहन मंत्री ( मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो) या रिक्षाचालकांना वठणीवर आणता आलेले नाही.

तर दोन रिक्षाचालकांनी १०० रुपये होतील असे सांगितले. अहो इतके होत नाहीत, फार फार तर ६० होतील, तेवढे देऊ असे सांगितले. पण १०० रुपयेच असे सांगितल्यावर आम्ही नको म्हणून रिक्षा सोडून दिली. मागोमाग आणखी एक रिक्षावाला आला. त्यानेही १०० रुपये सांगितले. इतके होत नाहीत कमी घ्या असे सांगितल्यावर तो ८० रुपयांत तयार झाला. रिक्षात बसल्यावर त्याला म्हटले, ८० रुपये ठरले आहेत ते देईन. पण मीटर टाका, किती पैसे होतील पाहायचेय आहे. त्यांनेही आढेवेढे न घेता मीटर टाकले.

ठाकुर्ली उड्डाणपुलावरून आमची रिक्षा नेली. मी मीटरकडे पाहात होतो. स. वा. जोशी हायस्कूलपर्यंत किमान भाडे २३ रुपये दाखवत होते. (इतर वेळी जोशी हायस्कूल गेलो असतो तरी रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने कमीतकमी ४० आणि जास्तीत जास्त ५० रुपये घेतलेच असते. पुढे मिराज सिनेमा येईपर्यंत २५/२६ रुपये झाले. ( इथपर्यंत यायचेही ६० रूपये सांगितले असते) शेलार नाका येईपर्यंत मीटरवर ३० रुपये आकडा होता. पुढे घार्डा सर्कलपर्यंत मीटरचा आकडा ३५/३८ होता आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहापाशी उतरलो तेव्हा मीटरचा आकडा फक्त ४८ रुपये दाखवत होता.

उतरताना आधी ठरल्याप्रमाणे रिक्षावाल्याला ८० रुपये दिले. आणि मीटरकडे अंगुलीनिर्देश केला तेंव्हा त्यांने हसून खांदे उडवले आणि तो निघून गेला.

आता इथे काही जण सल्ला देतील की वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार करा. काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत रिक्षा मीटरसक्ती व्हावी म्हणून माझ्यापरिने भरपूर प्रयत्न केले. अगदी मीटरसक्तीसाठी आघाडीच उघडली होती. माझी पत्नी, मुलगी यांनीही साथ दिली. त्यावेळी तेव्हाचे कल्याणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनीही णनावर घेऊन हा विषय लावून धरला. सहकार्य केले. ‘लोकसत्ता’ दैनिकाच्या माध्यमातून वेळोवेळी मीटरसक्ती हा विषय धसास लावायचा प्रयत्न केला.

आत्ताचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, रिक्षा चालक मालक संघटनांचे पदाधिकारी, अन्य सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंतही वैयक्तिक पातळीवर रिक्षा मीटरसक्तीसाठी मेल पाठवून, ट्विट करून लक्ष वेधले, पाठपुरावा केला.

पण आजतागायत डोंबिवलीत रिक्षामीटरसक्ती झालेली नाही. डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेर काही मुठभर बेशिस्त रिक्षाचालकांचा विळखाही कायम आहे. (किमान तो विळखा तरी दूर व्हावा म्हणूनही प्रयत्न केले. पण तो ही सुटलेला नाही)

ढिम्म सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन अधिकार यापैकी कोणीही बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणू शकलेले नाहीत. रिक्षा मीटरसक्तीची अंमलबजावणी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *