ठळक बातम्या

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांंचे निधन

मुंबई, दि. ४

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांंचे प्रदीर्घ आजाराने आज दादर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.‌ त्या ९४ वर्षांच्या होत्या. उद्या सोमवारी ( ५ मे ) सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी सुलोचना यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सुलोचना यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सुलोचना दीदी यांनी अमूल्य योगदान दिले आहे आहे. सुलोचना लाटकर असे त्यांचे नाव असले तरी चित्रपटसृष्टीत त्यांची ओळख ‘सुलोचना दीदी’ अशी होती.

सुलोचना दीदी यांची चित्रपट कारकीर्द भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटांममध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांबरोबर त्यांनी रुपेरी पडद्यावर महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. हिंदी आणि मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेल्या ‘आई’,’ वहिनी’ या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील.

पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. कोल्हापुरातील बाबुराव पेंटर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुलोचना दीदींचा जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला होता. ‘मोलकरीण’, ‘वहिनींच्या बांगड्या’, ‘मिठभाकर’, ‘धाकटी जाऊ’ हे मराठीतील त्यांचे गाजलेले चित्रपट.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *