ठळक बातम्या

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क येथे साजरा

मुंबई दि.२६ :- भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी  शिवाजी पार्क येथे मुख्य शासकीय सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. राज्यपालांनी यावेळी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले व विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. या शासकीय सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विविध देशांचे मुंबईतील राजदूत, सैन्य दले, प्रशासन तसेच पोलीस दलातील  वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या संचलनामध्ये भारतीय नौदल, यंदा प्रथमच निमंत्रित तेलंगणा पोलीस पथक, राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस  दल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस, मुंबई रेल्वे पोलीस  दल, गडचिरोली व गोंदियाचे सी – ६० पथक, गृहरक्षक  दल (पुरुष), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस  दल, गृहरक्षक  दल (महिला), राज्य उत्पादन शुल्क, वन विभाग, मुंबई अग्निशनमन  दल, बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा  दल व सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई  सहभागी झाले होते.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सादर केलेला ‘एक प्रवास ऑलिम्पिककडे’ या क्रीडा प्रात्यक्षिक व चित्ररथ तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सादर केलेल्या ‘महाराष्ट्राची वाद्य परंपरा’ या प्रात्यक्षिक व चित्ररथाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. राजभवन येथे राज्यपालांचे ध्वजारोहण प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवन येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *