प्रादेशिक भाषांमध्येही निकाल उपलब्ध करून देणे हे भारतीय न्यायव्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट- सरन्यायाधीश चंद्रचूड
मुंबई दि.२२ :- आधुनिक युगातील वाढत्या डिजिटलायझेनमध्ये न्यायालयांकडून प्रादेशिक भाषांमध्येही निकाल उपलब्ध करून देणे, हे भारतीय न्यायव्यवस्थेचे सध्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (Artificial Intelligence) मदत घ्यावीच लागेल, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड येथे केले.
रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात लोकायुक्तांकडून महापालिकेला ‘क्लिनचिट’
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवातर्फे दादर येथील स्वामीनारायण मंदिर येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवालाही उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयातील निकाल सर्वांना मोफत मिळावेत हे ई-एससीआरचे मूळ उद्दिष्ट आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे वकिलांनाही माहिती मोफत मिळू शकते. मात्र, केवळ निवाडे मोफत उपलब्ध करून देणे पुरेसे नाही. ग्रामीण भागातील वकिलांना जोपर्यंत सर्व निर्णय त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ही माहिती मिळविण्याबाबतचे अडथळे दूर करण्याचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, असेही चंद्रचूड यांनी सांगितले.