ठळक बातम्या

ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन

मुंबई दि.२१ :- ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. कालांतराने शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘ब्रिटिश बॅंक ऑफ दि मिडल इस्ट’ या बॅंकेत त्यांनी नोकरी केली. तब्बल चार दशके त्यांनी या बॅंकेत वेगवेगळ्या पदांवर काम केले. नोकरी सांभाळून त्यांनी आपली रंगभूमीची आवडदेखील जोपासली.

बृहन्मुंबई महापालिकेतर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण’ उपक्रम

प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी दीर्घ काळ काम केले. ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) या संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सचिव होते. या संस्थेतर्फे त्यांनी बरीच नाटके रंगभूमीवर सादर केली. ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे त्यांनी शेकडो प्रयोग सादर केले होते. काही नाटकांमध्ये त्यांनी अभिनयदेखील केला होता. ‘झुंजारराव’ नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे

अंबर कोठारे यांनी नाटकांची निर्मितीही केली होती. त्यापैकी एक प्रमुख नाटक म्हणजे ‘जेथे जातो तेथे’. या नाटकाच्या लेखनासाठी कोठारे यांनी प्रख्यात लेखक दत्ता भट यांना नाशिकवरून मुंबईत निमंत्रित केले होते. या नाटकामध्ये दत्ता भट यांच्यासोबतच अंबर कोठारे यांनीदेखील अभिनय केला होता. महेश कोठारे यांची निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट सर्वतोपरी चांगला होण्यासाठी अंबर कोठारे यांनी भरपूर कष्ट घेतले होते. त्यानंतर महेश कोठारे यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. ‘दे दणादण’ या चित्रपटामध्ये अंबर कोठारे यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने साकारली होती. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *