मनोरंजन

‘रेखा’ ‘चित्रा’ची गोष्ट!

शेखर जोशी
दोघी सख्या बहिणींनी एकाच वेळी, एकाच चित्रपटातून नायिका म्हणून पदार्पण करण्याचा सुदैवी आणि वर्ष वेगळे पण एकाच तारखेला या जगातून निरोप घेण्याचा दुर्दैवी योगायोग अभिनेत्री रेखा कामत आणि चित्रा नवाथे यांच्याबाबतीत घडला.’लाखाची गोष्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे दोघीही बहिणींनी ‘नायिका’ म्हणून एकाच वेळी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आणि ‘११ जानेवारी’ या एकाच तारखेला दोघी बहिणींनी या जगाचा निरोप घेतला. रेखा कामत याचे गेल्यावर्षी २०२२ मध्ये तर चित्रा यांचे यावर्षी निधन झाले.

रेखा आणि चित्रा यांची पूर्वीची नावे अनुक्रमे कुमुद आणि कुसुम. ‘महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ज्यांची ओळख आहे त्या गीतकार ग दि माडगूळकर यांनी या दोघी बहिणींचे नामकरण रेखा आणि चित्रा असे केले. माहेरच्या सुखटणकर. पटकथा लेखक ग. रा. कामत यांच्याशी विवाह झाल्यानंतर रेखा या कामत तर दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी विवाह झाल्यानंतर चित्रा या नवाथे झाल्या.

कुमुद आणि कुसुम यांच्या ‘रेखा चित्रा’ कशा झाल्या तोही एक किस्सा आहे. अभिनेत्री आणि नृत्यांगना हंसा वाडकर यांनी रेखा आणि चित्रा या दोघी बहिणीचे काम पाहिले होते. त्यांनी निर्माते दिग्दर्शक राजा परांजपे यांना या दोघींची नावे सुचवली होती. योगायोगाने त्याच वेळी राजा परांजपे ‘लाखाची गोष्ट’ चित्रपटाची निर्मिती करत होते. राजा परांजपे यांनी या दोघींना पुण्यात भेटायला बोलावले.

तिथे चित्रपटाचे कथा, पटकथा संवाद लेखक ग दि माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके हे ही उपस्थित होते. राजा परांजपे यांनी दोघी बहिणींना काहीतरी करून दाखवा असे सांगितले आणि त्यांनी ‘रामलीला’ या नृत्य नाटकातील काही प्रसंग सादर केले आणि दोघींचीही ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटासाठी निवड झाली. कुमुद आणि कुसुम ही नाव जुन्या वळणाची आहेत. चित्रपटासाठी ही नावे नकोत म्हणून ‘गदिमा’नी त्या दोघींचे अनुक्रमे रेखा आणि चित्रा असे नामकरण केले.

रेखा मोठ्या तर चित्रा या धाकट्या. दोघी बहिणींना नृत्याची आवड होती. गणेशोत्सव मेळाव्यातही दोघीही काम केले होते.
आचार्य पार्वती कुमार यांच्याकडे दोघींनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरविले होते पार्वती कुमार यांच्या ‘रामलीला’ या नाटिकेतही त्यांनी काम केले होते. दोघी बहिणींचे पाचवीनंतरचे शिक्षण दादरच्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास शाळेत झाले. सुखटणकर कुटुंबीय तेव्हा दादरच्या मीरांडा चाळीत राहायला होते. चाळीत आणि परिसरात होणाऱ्या गणेशोत्सव मेळाव्यात त्या भाग घेत होत्या.

‘गुळाचा गणपती’, वहिनीच्या बांगड्या’ ‘उमज पडेल तर’, राम राम पाव्हणं’ हे चित्रा यांचे गाजलेले चित्रपट. तर ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’ (यात दुहेरी भूमिका), ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’ तर अगदी अलीकडचा ‘अगंबाई अरेच्चा’ हे रेखा यांचे चे गाजलेले चित्रपट. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’,‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांतून तसेच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ आदी नाटकांतून रेखा यांनी भूमिका केल्या. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही त्यांची पहिली दूरचित्रवाहिनी मालिका. मालिकेत त्यांनी साकारलेली ‘आक्का’ ही भूमिका गाजली. ‘सांजसावल्या’ मालिकेतही त्यांनी काम केले. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधील ‘माई आजी’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

गेली पन्नास ते साठ वर्षे दोघी बहिणींनी चित्रपट, नाटकात योगदान दिले. आधी रेखा आणि आता चित्रा यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातील साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेल्या. रेखा आणि चित्रा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *