मुंबई आसपास संक्षिप्त
यंदाच्या वर्षासाठी २३ शासकीय सुट्ट्या जाहीर
मुंबई – यंदाच्या वर्षासाठी राज्य शासनाकडून 23 शासकीय सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या असून यातील चार सुट्ट्या शनिवारी आणि रविवारी आहेत.
२४ नवी आरोग्य केंद्रे सुरू
मुंबई – घराजवळ मोफत वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी आतापर्यंत ५२ बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली आहेत. आजपासून (२ जानेवारी) मुंबईत आणखी २४ नवी आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
‘विजय स्तंभाच्या स्मारकास शंभर एकर जमीन मिळावी’
मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक विजय स्तंभाचे भव्य स्मारक उभारण्यासाठी या परिसरातील शंभर एकर जमीन राज्य शासनाने संपादित करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या प्रश्नासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राणीच्या बागेला नववर्ष दिनी ३२ हजार ८२० पर्यटकांची भेट
मुंबई – नववर्ष दिनी मुंबईतील राणीच्या बागेला ३२ हजार ८२० पर्यटकांनी भेट दिली. ही आजवरची विक्रमी संख्या आहे. एक जानेवारी २०२३ या एकाच दिवशी सुमारे १३ लाख ७८ हजार ७२५ रुपयांचा महसूल राणी बागेला मिळाला आहे.
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांचे निधन
ठाणे – ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि प्रभात मित्र मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचे रविवारी राहत्या घरी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून,जावई, नातवंडे असा परिवार आहे.