वाहतूक दळणवळण

समृध्दी महामार्गावरून एसटी सुसाट पळणार नागपूर-शिर्डी बस सेवेचा उद्यापासून शुभारंभ

मुंबई दि.१४ :- प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) उद्यापासून ( १५) नागपूर ते शिर्डी या मार्गावर शयन आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे.
सदरची बससेवा ही नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ०९.०० वाजता सुटेल व पहाटे ०५.३० वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल. सदरच्या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. व वेळेमध्ये सव्वाचार तासांची बचत होणार आहे. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति १ हजार ३०० रुपये व मुलांसाठी ६७० रुपये इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येईल तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना तिकिटात ५० टक्के सवलत असणार आहे. बसमध्ये प्रवाशांना २X१ पध्दतीची ३० आसने (पुशबॅक पध्दतीची) बसण्यासाठी उपलब्ध असून १५ शयन आसने (Sleeper) आहेत.
याबरोबरच नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृध्दी महामार्गाव्दारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात येत आहे.

सदरची बससेवा ही नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १०.०० वाजता सुटेल व जालना मार्गे पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. सदर बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ कि.मी. व प्रवास वेळेमध्ये ४ तास ४० मिनिटांचची बचत होणार आहे. या बससेवेसाठी नागपूर ते औरंगाबाद या प्रवासाकरता प्रति व्यक्ति १ हजार १०० रुपये तर मुलांसाठी ५७५ रुपये प्रवासभाडे असणार आहे तर नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ति ९४५ रुपये व मुलांसाठी ५०५ रुपये इतके प्रवासभाडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *