मुंबई महानगर क्षेत्रात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई दि.२८ :- मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढच्या टप्प्यात सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे दिली. मुंबई फर्स्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबई सुशोभीकरण, आरोग्य व्यवस्था, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आदीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुंबई फर्स्ट संस्थेचे नरींदर नायर, संजय उबाळे, अशांक देसाई, नेवील मेहता, अश्वीनी ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार असून त्यामुळे खड्डेविरहीत रस्ते ही संकल्पना साकारली जाणार आहे. मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी चौक, रस्ते, पदपथ, फ्लायओव्हर यांच्या सुशोभीकरणाला सुरूवात झाली आहे. कोळीवाड्यांचे सुशोभीकरण केले जात असून त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पर्यटनाच्यादृष्टीने कोळीवाड्यांचा विकास केला जात असून तेथील खाद्यसंकृतीची ओळख पर्यटकांना होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
