ठळक बातम्या

डॉ. झाकीर नाईकला आश्रय देणार्‍या कतारला भारताने प्रत्युत्तर देण्याची गरज – अधिवक्ता सतीश देशपांडे

हिंदु जनजागृती समितीचा ‘विशेष संवाद’

मुंबई दि.२९ :- भारताने दहशतवादी म्हणून घोषित केलेला डॉ. झाकीर नाईक याला सध्या कोणताही देश आश्रय देत नसतांना कतारने त्याला आश्रय दिला आहे. याच कतारने हिंदु देवदेवतांची विडंबना करणारा वादग्रस्त चित्रकार मकबूल फिदा हुसेन यालाही आश्रय दिला होता. भारताने उपस्थित केलेल्या प्रश्नावर ‘डॉ. झाकीर नाईकला आम्ही बोलावले नाही’, असे ‘राजकीय उत्तर’ कतारने दिले आहे. डॉ. झाकीर नाईकला आश्रय देणार्‍या कतारचा भारतविरोधी इतिहास पाहता कतारला कसे प्रत्युत्तर द्यावे, हे भारताने ठरवण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट प्रतिपादन इतिहास व संस्कृती अभ्यासक आणि लेखक अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केले.

हिंदू जनजागृती समिती आयोजित ‘‘फिफा फुटबॉल विश्वचषकामध्ये जिहादी डॉ. झाकीर नाईक का आमंत्रित?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते. सुदर्शन न्यूजचे ‘चॅनेल हेड’ मुकेश कुमार म्हणाले डॉ. झाकीर नाईकला कट्टर इस्लामी देश कतारने फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजन कार्यक्रमात बोलावले. ‘फुटबॉल हा खेळ इस्लामनुसार ‘हराम’ असल्याचे चार वर्षांपूर्वी डॉ. झाकीर नाईक याने म्हटले होते. तसेच त्याने त्या वेळी फुटबॉल खेळणे, पाहणे यालाही मनाई केली होती. झाकीर नाईकने त्या वेळी मलेशियात आसरा घेतला असल्याने २०१७ पासून भारत सरकार त्याला आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.

झाकीर नाईकने अत्यंत हीन स्तरावर हिंदु देवदेवतांवर टीका करत अपमान केला आहे. हिंदू जनजागृती समितीसह विविध हिंदू संघटनांच्या विरोधामुळे झाकीर नाईकला भारताबाहेर पलायन करावे लागले. ‘इसिस’सारख्या आतंकवादी संघटनांतील अनेक अतिरेक्यांनी झाकीरच्या भाषणांमुळे प्रेरणा मिळाली, हे उघडपणे कबूल केले आहे. या आंतरराष्ट्रीय आतंकवाद्याला फिफा फुटबॉल विश्वचषकात बोलावणार्‍या कतारचा आम्ही भारतीय नागरिकांच्या वतीने धिक्कार करतो, असे हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *