‘२६/११’ च्या मुंबई अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई पोलीसांकडून कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई दि.२६ :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे शनिवारी पुष्पचक्र अर्पण करून १४ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवानांना श्रद्धांजली वाहिली.
मुंबई पोलिसांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात पोलीस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ व ‘बिगुलर लास्ट पोस्ट’ वाजविले. राज्यपाल कोश्यारी यांनी तिथे उपस्थित असलेल्या हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये , पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते.