साहित्य- सांस्कृतिक

मुलांच्या मनात सांस्कृतिक पर्यावरण रुजवणे गरजेचे- प्रा. प्रवीण दवणे

डोंबिवली, दि. ५
मुलांच्या मनात सांस्कृतिक पर्यावरण रुजविणे गरजेचे असून निसर्ग बालगीतातून तो उद्देश सहज साध्य करता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, लेखक प्रा. प्रवीण दवणे यांनी नुकतेच येथे केले.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आलाप, एकलव्य आर्ट फाउंडेशन आणि लहजा आर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथे ठाकूर सभागृहात ‘सृष्टी गान’ हा नृत्याविष्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

नव्या पिढीची मातृभाषेशी असलेली नाळ तुटत चालली असून मराठी भाषेचे वैभव त्यांना दाखविणे गरजेचे आहे. निसर्ग कविता शाळा शाळातून मुलांना शिकवायला हव्यात, असेही प्रा. दवणे म्हणाले.
‘सृष्टीगान’ कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन मकरंद वैशंपायन यांचे तर संगीत संयोजन सुखदा भावे, गोपाल दोंदडकर यांचे होते. नृत्यदिग्दर्शन शितल कपोले, सुनिला पोतदार यांचे होते.कार्यक्रमाचे निवेदन अनुया धारप, सौरभ सोहोनी यांनी केले.

कार्यक्रमात अरुणा ढेरे, कुसुमाग्रज, बालकवी, भा. रा. तांबे, प्रवीण दवणे यांच्या आणि काही नवीन कवींच्या कविता नृत्याविष्कारासह सादर झाल्या.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *