वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले सारथ्य

वर्धा दि.०४ :- समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाची पाहणी केली. नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तिथून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा सुरु केला. या पाहणी दौऱ्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहनाचे सारथ्य केले.

वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दोन टोल प्लाझा असून यापैकी विरुळ येथील टोल प्लाझाची त्यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार तसेच समृद्धी महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात ५५ किमीचा मार्ग वर्धा जिल्ह्यात सेलू, वर्धा व आर्वी या तालुक्यातून महामार्ग जात आहे. एकुण लांबी ५५ किलोमीटर आहे. महामार्गाची रुंदी १२० मीटर असून हा मार्ग ६ पदरी आहे. मार्गावर ५ मोठ्या आणि २७ लहान अशा ३२ पुलांचा समावेश आहे. महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा होण्यासाठी ९ ठिकाणी उड्डान पूल उभारण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.