युवा उद्योजक भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवतील
राज्यपाल कोश्यारी यांचे प्रतिपादन
मुंबई दि.०४ :- देशात तसेच राज्यात अनेक स्टार्टअप व युनिकॉर्न कंपन्या निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये होत असलेली प्रगती पाहता, देशातील युवा उद्योजक भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवतील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी येथे केले. औरंगाबाद येथील मुक्त पत्रकार, लेखक दत्ता जोशी लिखित ‘मूव्हिंग ऍस्पिरेशन्स’ – नेक्स्टजेन च्या २५ परिणामकारक कथा’ या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायांमध्ये दुसऱ्या पिढीतील युवक युवती नवनव्या संकल्पना घेऊन पुढे येत आहेत. हे युवक युवती उच्च विद्याविभूषित असून त्यांना जागतिक व्यापार प्रवाहांची माहिती आहे. या युवा उद्योजकांच्या यशोगाथा वाचून शंभरपैकी दहा युवकांनी प्रेरणा घेतली तरी त्याचा त्यांना व राज्याला फायदा होईल, असेही राज्यपालांनी सांगितले.
कौटुंबिक व्यवसायातील नव्या पिढीतील उद्योजकांच्या २५ परिणामकारक कथा असलेल्या दत्ता जोशी यांच्या पुस्तकाचे साहित्यमूल्य फार मोठे आहे. स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे होईल त्यावर्षी किमान २५००० युवा उद्योजकांच्या यशोगाथा लिहिल्या जातील असा विश्वास मराठवाडा विभागाचे ‘सीआयआय’चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केला. लेखक दत्ता जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘मूव्हिंग ऍस्पिरेशन्स’ या पुस्तकामध्ये जैन इरिगेशन समूहातील अभेद्य व अथांग जैन, यशप्रभा समूहाचे अमित घैसास, अभिजित डाइज अँड टूल्सचे निखिल व अभिजित नरेश राऊत, पितांबरी उत्पादने उद्योगाचे प्रतिक्षीत रवींद्र प्रभुदेसाई, यांसह मिहीर वैद्य, सुमित धूत, कपिल राठी, स्वराली सावे, कौस्तुभ फडतरे यांसह २५ उद्योजकांच्या यशोगाथा देण्यात आल्या आहेत.