उल्हासनगर दि.२३ :- सिंधी बांधवांच्या ‘चालिया’ उत्सवाच्या सांगतेनिमित्ताने उल्हासनगर येथे उद्या ( २४ ऑगस्ट) कॅम्प एक ते हिरा घाटपर्यंत मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या विविध रस्त्यांवरची वाहतूक काही तासांसाठी अन्यत्र वळविण्यात आली असून अनेक रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या ‘चालिया’ उत्सवाची सांगता होणार आहे.
उल्हासनगर कॅम्प एक भागातील झुलेलाल मंदिरापासून मिरवणूकीला सुरूवात होणार असून साधुबेला चौक, सिरू चौक, नेहरू चौक मार्गे लिंक रस्ता, न्यु इरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पवई चौक या मार्गाने मिरवणूक निघून हिराघाट येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे. उल्हासनगर कॅम्प एक ते तीन दरम्यान पर्यायी वाहतूक पुढीलप्रमाणे असणार आहे- झुलेलाल मंदिर मार्ग – भारत चौक – गोल मैदान – तसेच बिलगिट व इतर ठिकाणी जाणारी वाहतूक झुलेलाल चौक येथून खेमाणी, मासळी बाजारमार्गे इच्छित स्थळी जातील.
उल्हासनगर वाहतूक उप विभाग समोरील चौक येथून भारत चौक मार्गे खेमाणी धोबीघाट झुलेलाल चौक मार्गे जाणारी सर्व प्रकारची वाहने उल्हासनगर वाहतूक उपविभाग कार्यालय येथून ओटी क्रमांक १ मार्गे बाबा बसंतराम दरबार मच्छी मार्केटमार्गे जातील. भारत चौकमार्गे गोल मैदान नेहरु चौककडे जाणारी वाहतूक मच्छी मार्केट तसेच बाबा बेफिक्री चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
नेहरु चौकमार्गे शिरु चौक तसेच खेमाणीकडे जाणारी वाहतुक मासळी बाजार, भारत चौक मार्गे जातील. शिवाजी चौकात अंबरनाथ कल्याण रस्त्याने कल्याणकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने फॉलवर लाईनमार्गे जवाहर हॉटेल – नेहरू चौक गोल मैदान मार्गाने इच्छित स्थळी जातील. तर मधुबन चौक गुरूद्वारा चौक शांतीनगर मार्गे तसेच कल्याण अंबरनाथ रोडने अंबरनाथ दिशेने जाणारी वाहतूक होंडा शोरुम येथे डावे वळण घेवून डॉल्फीन क्लब, गुरुद्वारा चौक इच्छित स्थळी जातील, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.