मुंबई दि.२३ :- शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘बदल घडवूया’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वच्छता मॉनिटर्स बनलेले विद्यार्थी स्वच्छतेच्या बाबतीत आमूलाग्र क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे व्यक्त केला. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत लेट्स चेंज उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर्स बनविले आहे. याचा शुभारंभ काल सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, सहसचिव इम्तियाज काझी, लेट्स चेंज उपक्रमाचे संचालक रोहित आर्या यांच्यासह स्वच्छता मॉनिटर विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. निश्चय केला की बदल घडतोच. त्यातही लहान मुले सांगतात ते मोठ्यांना ऐकावेच लागते. स्वच्छता हा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असून लेट्स चेंज या उपक्रमात ६४ हजार शाळांमधील ३८ लाख विद्यार्थी सहभागी होत असल्याने स्वच्छतेच्या बाबतीत आमूलाग्र बदल घडेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
स्वच्छतेची चळवळ देशभर सुरू असून राज्यात स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी समाजाला बदलण्याची किमया करू शकतात, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. प्रकल्प संचालक रोहित आर्या, राघवी पालांडे, श्रेया पवार, प्रदिप्ता घोष आदी स्वच्छता मॉनिटर्स विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.