Thursday, August 20, 2026
Latest:
मनोरंजन

हॉलिवूडच्या भूमीत मराठी सिनेमाचा डंका: सॅन होजे येथे ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न

सॅन होजे, कॅलिफोर्निया:

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सॅन होजे येथील ऐतिहासिक ‘कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये आयोजित करण्यात आलेला तिसरा ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (NAFA) मराठी चित्रपट महोत्सव २०२६ अत्यंत दिमाखदार आणि उत्साही वातावरणात पार पडला. ७ ते ९ ऑगस्टदरम्यान पार पडलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाला अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकप्रेक्षकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ५ मुख्य मराठी चित्रपटांचे प्रीमिअर आणि ११ पुरस्कारप्राप्त लघुपटांचे (शॉर्टफिल्म्स) विशेष स्क्रीनिंग हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले.

कॅलिफोर्नियात आजपासून तिसरा ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सव; जागतिक प्रीमिअर्स, मास्टरक्लासेस आणि पुरस्कार सोहळ्याची रंगणार पर्वणी

मराठी कलाविश्वाचा ‘ग्लोबल स्वॅग’ आणि रेड कार्पेट सोहळा

हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेसा रेड कार्पेट सोहळा या महोत्सवाची नांदी ठरला. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, महेश कोठारे, अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अजिंक्य देव, प्रसाद ओक, गिरीजा ओक, श्रुती मराठे, अर्चना जोगळेकर, तृप्ती भोईर, सई देवधर, मंजिरी ओक आणि गार्गी कुलकर्णी या दिग्गजांच्या उपस्थितीने परिसर उजळून निघाला. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिक ग्लोबल शैलीचा सुरेख संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.

अमेरिकेतील स्थलांतर वादावर भाष्य करणाऱ्या ‘Undocumented.PDF’ लघुपटाचा ९ ऑगस्टला वर्ल्ड प्रीमियर

रोहिणी हट्टंगडी यांना ‘नाफा जीवन गौरव’

महोत्सवामधील सर्वात भावुक क्षण ठरला तो ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘नाफा जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा. हा सन्मान स्वीकारताना त्यांनी, “भारताबाहेर मिळालेला हा पहिलाच पुरस्कार असल्याने हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे. जीवन गौरव मिळाला तरी अजून खूप काम करायचे आहे, घरी बसण्याचा माझा विचार नाही,” असा निर्धार व्यक्त केला.

दिग्गजांची सत्रे आणि सुसंवाद

चित्रपटांसोबतच महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांच्या चर्चासत्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली:

महेश कोठारे: “मराठी सिनेमाची खरी ताकद त्याच्या मातीशी जोडलेल्या कथांमध्ये असून ती जगापर्यंत पोहोचायला हवी.”

नागराज मंजुळे: “आपल्या मातीतील कथा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील प्रेक्षकांच्या मनाला भिडू शकतात.”

अजिंक्य देव: “आजच्या बदलत्या काळात मराठी कलाकारांसाठी संपूर्ण जगाचे व्यासपीठ खुले झाले आहे.”

प्रसाद ओक व गिरीजा ओक: परदेशातील प्रेक्षकांचे प्रेम हीच मराठी सिनेमाची खरी ताकद असून ‘नाफा’सारखी व्यासपीठे कलाकार व प्रेक्षकांमधील अंतर मिटवतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्रुती मराठे: नव्या पिढीतील कलाकारांसाठी मराठी कथा जागतिक स्तरावर नेण्याची ही मोठी संधी असल्याचे मत मांडले.

सॅन होजेत मराठी संस्कृतीचा जागतिक जल्लोष! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘NAFA 2026’ फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहणार

शासकीय पाठबळ आणि जागतिक ओळख

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यास विशेष शुभेच्छा संदेश पाठवला. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे महोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले, “नाफा हा केवळ चित्रपट महोत्सव नसून अमेरिकेच्या भूमीत मराठी भाषा, संस्कृती आणि कला यांचा जागतिक जागर आहे. नव्या पिढीला आपल्या भाषा-संस्कृतीशी जोडणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.”

पुढील वर्षी आणखी व्यापक आणि नवीन उत्साहाने परतण्याचे वचन देत ‘नाफा २०२६’ ची सांगता झाली. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, टाळ्यांचा कडकडाट आणि कलाकारांचा सहभाग यामुळे हा सोहळा जागतिक पटलावर मराठी अस्मितेचा ध्वज फडकवणारा ठरला आहे.