Thursday, August 20, 2026
Latest:
मनोरंजन

कॅलिफोर्नियात आजपासून तिसरा ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सव; जागतिक प्रीमिअर्स, मास्टरक्लासेस आणि पुरस्कार सोहळ्याची रंगणार पर्वणी

मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान-सन्मान मिळवून देणारा आणि जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा ‘नाफा’ (NAFA) चित्रपट महोत्सव २०२६ आजपासून (७ ऑगस्ट) अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे अत्यंत दिमाखात सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित हा तीन दिवसीय सोहळा ७, ८ आणि ९ ऑगस्टदरम्यान रंगणार असून, सॅन होजे शहर पूर्णपणे मराठीमय होणार आहे. या महोत्सवात जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि भव्य पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याची माहिती नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी दिली.

सॅन होजेत मराठी संस्कृतीचा जागतिक जल्लोष! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘NAFA 2026’ फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहणार

महोत्सवाचे दिवसानिहाय आकर्षण:

पहिला दिवस (शुक्रवार, ७ ऑगस्ट) : रेड कार्पेट आणि पुरस्कार सोहळा महोत्सवाची सुरुवात चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेट आगमनाने होईल. सायंकाळी मीडिया लाऊंज, फॅशन शो आणि त्यानंतर ‘ऑवर्ड्स नाईट गॅला’ (Awards Night Gala) आयोजित करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाईल.

मराठी चित्रपटसृष्टीचा डंका आता अमेरिकेत! महाराष्ट्र शासन आणि ‘नाफा फिल्म फेस्टिव्हल’ यांच्यात ऐतिहासिक करार

दुसरा दिवस (शनिवार, ८ ऑगस्ट) : वर्ल्ड प्रीमिअर्स आणि मास्टरक्लासेस दुसऱ्या दिवशी ‘ना आवडती गोष्ट’, ‘तू मी आणि अमायरा’ आणि ‘द्विधा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स होतील. यासोबतच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित लघुपट प्रदर्शित केले जातील. अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष ‘मास्टरक्लासेस’ होतील. तसेच अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्याशी रसिकांना ‘मीट अँड ग्रीट’ सत्रात थेट संवाद साधता येईल. याशिवाय अतुल कुलकर्णी यांची ‘Micro Drama’ कार्यशाळा, ‘Director’s Grid’ आणि सरिता कौशिक यांच्यासोबत ‘Coffee with Kaushik’ हे कार्यक्रम पार पडतील.

तिसरा दिवस (रविवार, ९ ऑगस्ट) : नवीन चित्रपट, विद्यार्थी लघुपट व समारोप अंतिम दिवशी ‘पारो’ आणि ‘Frames’ हे चित्रपट आणि ‘Undocumented.PDF’ या लघुपटाचे प्रीमिअर होईल. तसेच Andesha, Panha, Baburao in Love with Ella, H1B or Not Be, Keki आणि Those Left Behind या विद्यार्थी दिग्दर्शकांच्या लघुपटांचे विशेष प्रदर्शन होईल. दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन आणि संवादानंतर भव्य समारोप सोहळ्याने (Closing Ceremony) या महोत्सवाची सांगता होईल.

हॉलिवूडच्या झगमगाटात रंगणार ‘नाफा २०२६’! सॅनहोजेमध्ये ७ ते ९ ऑगस्टदरम्यान तिसरा मराठी चित्रपट महोत्सव

मराठी चित्रपटांच्या जागतिक प्रवासातील मैलाचा दगड:

जगभरातील मराठी रसिक, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना एकत्र आणणारा हा महोत्सव मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी व्यक्त केला आहे.