Thursday, June 25, 2026
Latest:
सामाजिक

डोंबिवलीतील कोपरगाव तलावाचा श्वास मोकळा; तरुण आणि नागरिकांच्या पुढाकाराने राबवली विशेष स्वच्छता मोहीम

डोंबिवली: पर्यावरणाचे रक्षण आणि तलावांच्या संवर्धनासाठी रविवारी डोंबिवलीत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. ‘निर्मल यूथ फाउंडेशन’ (NYF) आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (क.डो.म.पा.) यांच्या संयुक्त विद्यमाने म्हाळसा मंदिराजवळील कोपरगाव तलाव परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तरुण आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन तलाव परिसराचा कायापालट केला.

युवा शक्तीचा पर्यावरणासाठी पुढाकार

३ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत ही मोहीम पार पडली. या उपक्रमात प्रगती ज्युनिअर कॉलेजच्या NSS युनिटचे स्वयंसेवक आणि सुमित एल्कोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेडचे कर्मचारी देखील सहभागी झाले होते. केवळ दोन तासांत सुमारे ५० स्वयंसेवकांनी तलावाच्या काठावरील प्लास्टिक, कचरा आणि अस्वच्छता दूर करून परिसर चकाचक केला.

 

प्रशासनाचे मार्गदर्शन आणि मान्यवरांची उपस्थिती

या मोहिमेला ‘ह’ प्रभाग, क.डो.म.पा.चे स्वच्छता अधिकारी अमोल पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी कचरा व्यवस्थापन आणि जलस्रोतांचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.

तसेच निर्मल यूथ फाउंडेशनच्या अध्यक्षा कुमारी अक्षता औटी यांनी युवकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. या उपक्रमात स्थानिक ज्येष्ठ नागरिक जयंत आंबेटकर यांनीही प्रत्यक्ष सहभागी होऊन तरुणांचा उत्साह वाढवला.

डोंबिवली: कोपरगाव तलाव स्वच्छतेसाठी ‘निर्मल’ पुढाकार; ३ मे रोजी स्वच्छता मोहीम

स्थानिकांसाठी प्रेरणादायी उपक्रम

तलावाचे वाढते प्रदूषण रोखणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. “स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती एक सवय बनली पाहिजे,” अशी भावना सहभागी स्वयंसेवकांनी व्यक्त केली. या मोहिमेचे स्थानिक परिसरातून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे शहरांमधील नैसर्गिक जलस्रोत टिकून राहण्यास मदत होणार आहे.