भिवंडी निजामपूर महापालिकेतील काँग्रेसचे १८ माजी नगरसेवक सहा वर्षासाठी अपात्र –
सुनावणीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
मुंबई, दि. २७
भिवंडी निजामपूर महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या १८ माजी नगरसेवकांना सहा वर्षासाठी अपात्र करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावणीदरम्यान दिला आहे.
भिवंडी निजामपूर महापालिकेतील एकूण नगरसेवकांचे संख्याबळ ९० इतके असून महापालिकेत काँग्रेसचे ४७ नगरसेवक निवडून आले होते. अडीच वर्षांनंतर म्हणजेच ५ डिसेंबर २०१९ च्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून ऋषिका राका यांच्या नावाची घोषणा केली.
पक्षातील १८ नगरसेवकांनी या नावाला नापसंती दर्शवून बंडखोरी करुन वेगळा गट स्थापन केला.
महापौरपदाच्या रिंगणातील स्पर्धक उमेदवार प्रतिभा पाटील यांना मतदान केले. पालिकेत बहुमत असतानाही काँग्रेसचा पराभव झाला.
काँग्रेसचे नेते जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे १८ माजी नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी तक्रार केली. कोकण विभागीय आयुक्तांकडे झालेल्या सूनवणीमध्ये १८ माजी नगरसेवकांच्या बाजूने निकाल लागला. गेल्यावर्षी या नगरसेवकांची पंचवार्षिक मुदत संपली.
कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाविरोधात जावेद दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली होती.
त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी सुनावणी घेऊन हे प्रकरण निकाली काढले. यामध्ये कोकण आयुक्तांचे आदेश रद्द करत १८ माजी नगरसेवकांना महाराष्ट्र महानगरपालिका सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ कलम ३ (१) (ब) अन्वये अपात्र घोषित करण्यात आले. ३१ डिसेंबर २०२१ पासून ते पुढे ६ वर्षाच्या कालावधीकरिता या सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे, असा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.
——
